Shirur Crime – शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप उघडून कपाटातील सुमारे ७ लाख ८१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित शेतकरी कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बाजीराव घाडगे हे १० मे रोजी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ४ लाख ५० हजार रुपयांचे ७.५ तोळे वजनाचे साखळी गंठन, १ लाख ८० हजारांची मोहन माळ, मिनी गंठन, डोरले आणि चांदीच्या वस्तू असा एकूण ७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल लांबवला आहे. चोरट्यांनी घराची रेकी करूनच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार भागवत पुढील तपास करत आहेत.