Shirur Crime – चांडोह (ता. शिरूर) येथील सालकरमळा परिसरात शेतीच्या नांगरणीच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जोरदार मारहाणीत झाले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती राजेंद्र दळवी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी आणि त्यांची जाऊ शेताजवळ उभ्या असताना विश्वास चंद्रकांत सालकर हा ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करत होता. फिर्यादींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता वादाला सुरुवात झाली. त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून दळवी कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत फिर्यादीची सासू सुमन दळवी आणि जाऊ प्रियांका दळवी यांच्या गळ्यातील प्रत्येकी अर्धा तोळ्याचे मनीमंगळसूत्र तुटून हरवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी विश्वास सालकर, जयहिंद सालकर, स्वप्नील सालकर, संजय सालकर, राजेंद्र सालकर, मंदाबाई सालकर, प्रिती सालकर, चंद्रकांत सालकर आणि अविनाश सालकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पालवे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.