Shirur Crime : बेट भाग चोरट्यांच्या विळख्यात! कवठे, मलठण, शिंगाडवाडीत एका रात्रीत धुमाकूळ; दुकाने फोडली, घरावरही डल्ला
Shirur Crime : सलग चोरीच्या घटनांनी पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह; नागरिकांमध्ये संताप

Shirur Crime : शिरूर तालुक्यातील बेट भागात चोरट्यांनी सोमवारी (दि. २९) पहाटे अक्षरशः धुमाकूळ घालत कवठे येमाई, मलठण आणि शिंगाडवाडी या तीन गावांमध्ये एका रात्रीत सलग चोरीच्या घटना घडविल्या. दोन दुकाने फोडून रोकड व ऐवज लंपास करण्यात आला, तर एका दुकानात चोरीचा प्रयत्न फसला.
याशिवाय मलठण येथे बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावरील न्यू जय मल्हार मेडिकल या सागर करंडे यांच्या दुकानाचे मुख्य कुलूप उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गल्ल्यातील सुमारे ३० हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याआधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
याच परिसरातील तेजस दुडे यांच्या कुंडाई मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुकानात प्रवेश करण्यात चोरट्यांना अपयश आले. तसेच बबन जाधव यांच्या पेशवा कलेक्शन या कापड दुकानाचेही शटर उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र येथेही चोरट्यांचा डाव फसला.
दरम्यान, शिंगाडवाडी येथील जय मल्हार अॅग्रो कृषी साहित्य केंद्र व किराणा दुकान फोडून चोरट्यांनी तेथूनही ऐवज लंपास केला. चोरीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नसला, तरी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
मलठण-पाबळ रस्त्यावरील अॅड. प्रताप शिंदे यांच्या बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शिंदे कुटुंबीय बाहेरगावी असल्याने घरातील किती ऐवज चोरीला गेला, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड येथे दोन वीज रोहित्रे फोडून शेतकऱ्यांच्या विद्युत केबलची चोरी करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता तीन गावांमध्ये सलग चोरीच्या घटनांनी बेट भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, रात्रीच्या गस्तीचा अभाव, वाढते अवैध धंदे आणि संशयास्पद हालचालींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे चोरट्यांचे फावले आहे. “पोलिस गस्त केवळ कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल व्यापारी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; गुन्हेगारांचे मनोबल वाढले –
बेट भागात अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध हालचालींना आळा न बसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सलग चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना तातडीने अटक करून बेट भागातील रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





