प्रभात वत्तसेवा शिरूर – तालुक्यातील सरदवाडी येथे दारूच्या नशेत एका तरुणाने महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता अशोक सनन्से (वय २६, रा. सरदवाडी, ता. शिरूर) या त्यांच्या बहिणीच्या घरासमोर बसल्या असताना आरोपी राहुल तुकाराम माळी (रा. सरदवाडी, मुळ रा. बोराखेडी) हा दारूच्या नशेत येऊन मला जेवायला दे, नाहीतर पैसे दे, मला गावाकडे जायचंय अशी मागणी त्याने वनिता यांच्याकडे केली असता वनिताने पैसे नसल्याचे त्याला समजावून सांगितले. आरोपीने संतापून तिच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार करून एवढ्यावर न थांबता आज तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिली. वनिता गंभीर जखमी झाली असून पोलिसांनी वनिताच्या फिर्यादीवरून राहुल माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे हवालदार कळमकर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच कारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महीला व मुलांना जिवंत जाळण्यात आले होते. गुंडांना कायदयाचे भय राहीले नसून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.