प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथे शेतीच्या बांधावर दगड ठेवल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एकाला सावत्र भावाने विळ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सतीश राजाराम थिटे, लता सतीश थिटे आणि सिंधूबाई राजाराम थिटे या तिघांविरूद्ध शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीषा थिटे मकाला पाणी देत असताना सतीश थिटे यांनी शेताच्या बांधावर दगड ठेवले. मनीषा यांनी याचा जाब विचारला असता, सतीशसह त्याची पत्नी लता थिटे व आई सिंधूबाई थिटे यांनी मनीषा यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी गणेश थिटे (वय ३६) मध्ये आले असता, त्यांचा सावत्र भाऊ सतीश थिटे याने गणेश यांना विळ्याने मारहाण केली. तर लता थिटे व सिंधूबाई थिटे यांनी गणेश यांची पत्नी मनीषा यांना मारहाण केली.याबाबत गणेश राजाराम थिटे यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर करत आहेत.