6 महिन्यांपासून रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे शिरुरकर हैराण, त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी

शिरूर : शिरुर शहराला जोडला जाणारा शिरुर बायपास ते पाबळ फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुमारे सहा महिन्यांपासुन सुरु आहे. या रस्त्यांवर केलेल्या खोदकामामुळे शिरुरकर हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा टाकण्यात आलेल्या अंतर्गत भुयारी गटारीच्या कामामुळे आणि मध्यभागी टाकण्यात येत असलेले डिव्हायडर यामुळे शिरुरकरांना या रस्त्यावर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या कामामुळे अनेक वाहने घसरून वारंवार अपघात देखील झालेले पाहवयास मिळत आहे. दुसरीकडे नगरपरिषदेमध्ये प्रशासक असल्याने या निर्धास्त ठेकेदारांवर अंकुश नसल्याने अतिशय संथ गतीने काम सुरु असल्याचे दिसत आहे .
शिरुर नगरपरिषदेने पाबळ फाटा चौक ते माजी वसुंधरा महामार्ग आणि कुमार प्लाऊड ते सर्टिफाइड हायस्कूल अशा तीन टप्प्यात सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून रस्त्याच् डांबरीकरण व फुटपाथचे काम टप्प्याटप्प्यावर ठेकेदार नेमुन दिले आहे. परंतु सदर ठेकेदारांकडून अतिशय संथ गतीने काम सुरु असुन हा रस्ता पुर्णपणे खिळखिळा झाला आहे.
यातच शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने सातत्याने वाहतूक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम एकाच वेळी दुतर्फा सुरु असल्याने पडलेले खड्डे टाकलेला कच यातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. टप्प्याटप्प्यावर काम करणे आवश्यक असताना एकाच वेळी रस्ता खोंदुन ठेवल्याने दोन्ही बाजूकडून वाहन चालवताना अनेक वेळा अपघात देखील होत आहे.
शिरुरचे मुख्याधिकारी आता सदर ठेकेदारांवर काही कारवाई करणार का हे पाहावे लागेल. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन शेकडो शिरुरकर या कामाला वैतागले आहे. याबाबतीत मुख्याधिकारी यांनी ठेकेदारांना योग्य त्या सुचना दिल्या पाहिजेत, पर्यायी कठोर कारवाई केली पाहिजे. रोज या रस्त्यांवर जाणाऱ्या लोकांचे हाल लक्षात घेता या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला प्रतिकात्मक आयोडेक्स बाम देण्याचे आंदोलन करणार असल्याचे भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी सांगितले आहे.





