Shirur : पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा
Shirur : शिरूर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुल सुरेश वाळके (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirur : शिरूर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राहुल सुरेश वाळके (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप हनुमंत पोटघन (वय ५०, रा. जातेगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती शिरूर येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयात गट शिक्षण अधिकारी प्रितम कोकणे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, कनिष्ठ सहायक विनीता माने, वरिष्ठ सहायक रविंद्र भाजीभाकरे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राहुल वाळके हे कार्यालयात येऊन करंजावणे गावासाठी पदवीधर शिक्षकाची नियुक्ती का करण्यात आली नाही, याबाबत गट शिक्षण अधिकारी कोकणे यांच्याशी वाद घालू लागले. संबंधित मागणीसंदर्भात जिल्हा परिषद पुणे स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवालही त्यांना दाखविण्यात आला. मात्र, त्यानंतरही वाळके यांनी कार्यालयात गोंधळ घालत कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रदीप पोटघन यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोटघन व गट शिक्षण अधिकारी कोकणे यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातही वाद सुरूच राहिला. यावेळी “तू बाहेर ये, तुला बघून घेतो,” अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार राहुल सुरेश वाळके यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे व धमकी देणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते करीत आहेत.





