Shirur : शिरूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात; दुष्काळाच्या धगीत केबल, कृषीपंप चोरीला
Shirur : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि जांबूत परिसरात २० हून अधिक शेतकऱ्यांच्या केबल आणि चार कृषीपंपांची चोरी झाली. शेतकऱ्यांचे पाच लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज.

Shirur : जांबूत – दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या शिरूर तालुक्यातील बेट भागातील शेतकऱ्यांसमोर आता चोरट्यांचे संकट उभे राहिले आहे. पिंपरखेड आणि जांबूत परिसरात घोड व कुकडी नदीकाठावरील २० हून अधिक शेतकऱ्यांच्या केबल तसेच चार कृषीपंप चोरीला गेले आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे पाच लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरखेड येथील घोड नदीकाठावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी १५ ते २० शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या. याशिवाय एक विद्युत ट्रान्सफॉर्मरही निकामी करण्यात आला होता. जांबूत परिसरातही गेल्या सहा महिन्यांत दोन ते तीन वेळा कृषीपंप आणि केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
या घटनांची माहिती शेतकऱ्यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राला दिली होती. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सध्या बेट भागात दुष्काळाची तीव्र परिस्थिती आहे. जनावरांसाठी चारा, तसेच ऊस आणि भाजीपाला पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कृषीपंप आणि केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढली आहे.
दरम्यान, या चोरीच्या घटनांमधील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. आरोपींवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा काही शेतकऱ्यांनी दिला आहे.
‘शेतकऱ्यांशी संबंधित अशा घटना गंभीर आहेत. याबाबत पथक तयार करून योग्य सूचना देण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यांतील आरोपींचा लवकरच शोध घेण्यात येईल,’ असे शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी सांगितले.





