शिरूर-अण्णापूर रस्त्याची बेशिस्तपणे दुरुस्ती; निष्काळजी कामामुळे अपघाताचा धोका, नागरिकांचा रोष

शिरूर – शिरूर-अण्णापूर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असले तरी ते अत्यंत निष्काळजी आणि भोंगळ पद्धतीने केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकताना तांत्रिक पद्धतीचा विचार न करता चक्क मोठमोठे मुरमाचे खडे रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हे खडे रस्त्यावर विखुरले गेले असून दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मुरूम टाकल्यानंतर त्यावर रोलिंग न करता काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. परिणामी हा मुरूम सैल राहिल्याने वाहन घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग वाहनचालकांच्या जीवाशी खेळत आहे. खड्डे बुजविण्याचे काम तंत्रशुद्ध पद्धतीने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू. तसेच या रस्त्यावर टाकण्यात आलेला मुरूम रॉयल्टी न भरता कुठून आणला याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. याची तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.
दरम्यान, या रस्त्यावरून शिरूर व आण्णापूर दरम्यान दररोज हजारो दुचाकी व चारचाकी वाहने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि त्यावर टाकलेले मुरमाचे खडे हे अपघातांना आमंत्रण देत आहेत. प्रशासनाने तात्काळ तांत्रिक मानकांनुसार रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांचा जीव वाचवावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

