Nhavare News : शिरुर तालुक्यातील आंधळगाव परिसरात रविवार (दि. 10) पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला, तर महिला, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसह १४ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. (Nhavare News) शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादा गंगाराम पवार (रा. राहू, ता. दौंड) हे महिंद्रा पिकअप (MH 42 BF 0699) घेऊन ऊसतोड कामगारांना घेऊन जात होते. रविवारी पहाटे ५:२० वाजण्याच्या सुमारास आंधळगाव येथील सीएनजी पंपासमोर न्हावरा-चौफुला मार्गावर समोरून आलेल्या अशोक लेलंड कंटेनरने (MH 12 NX 2919) भरधाव वेगात पिकअपला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसर दणाणून गेला. पिकअपचा चक्काचूर झाला असून वाहनातील कामगार अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. काही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर लहान मुलांच्या आक्रोशाने परिसर हेलावून गेला. (Nhavare News) या भीषण अपघातात संगीता सुनील मोरे (वय ३५) आणि रविन सखाराम सोनवणे (वय ४५) या दोघांचा मृत्यू झाला. संगीता मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रविन सोनवणे यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अपघातातील जखमींमध्ये तीन ते पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. ऊसतोडीसाठी घरदार सोडून आलेल्या या मजुरांवर काळानेच घाला घातल्याची भावना व्यक्त होत आहे. (Nhavare News) धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडवून कंटेनर चालक अनिल सुभाष वानखेडे हा घटनास्थळावरून फरार झाला. जखमी रस्त्यावर तडफडत असताना चालकाने मदतीऐवजी पळ काढल्याने संतप्त नागरिकांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Nhavare News) गरीब मजुरांचे जीव इतके स्वस्त झालेत का? दरवर्षी ऊसतोड कामगारांना जनावरांसारखे पिकअप, ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमध्ये कोंबून नेले जाते. ना सुरक्षेची हमी, ना नियमांचे पालन! प्रशासन मात्र अपघात झाल्यावरच जागे होते. निष्पाप मजुरांच्या मृत्यूनंतर काही दिवस कारवाईचा दिखावा होतो आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (Nhavare News) वाहतूक विभाग आणि पोलिसांची जबाबदारी कोण ठरवणार? न्हावरा-चौफुला मार्गावर अवजड वाहनांचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. बेफाम कंटेनर, नियमबाह्य प्रवासी वाहतूक आणि निष्क्रिय यंत्रणा यामुळे हा मार्ग “मृत्यूचा कॉरिडॉर” बनत चालल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या प्रकरणी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत. (Nhavare News)