पुणे – शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (दि.2) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर मावळ मतदारसंघासाठी पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 9 एप्रिलपर्यंत असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
यंदा प्रथमच जिल्ह्यात दोन टप्यात निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या टप्प्यात शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती मतदारसंघासाठीची उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दि.28 मार्चपासून सुरू झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी शिरूर आणि मावळसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू मंगळवारपासून सुरू होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी दि. 10 एप्रिलला संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही 12 एप्रिलपर्यंत आहे. तर मतदान दि. 29 एप्रिलला होणार असून मतमोजणी दि.23 मे ला होणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी “पीएमआरडीए’ अतिरिक्त आयुक्त कविता द्वीवेदी या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.