Shirur Accident – कासारी (ता. शिरूर) येथे कासारी ते तळेगाव ढमढेरे बायपास रस्त्याने प्रवास करत असताना दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवाजी मोहन फुलारे असे मृताचे नाव असून, तो मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी होता.मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी फुलारे हा आपल्या ताब्यातील एम एच २३ ए जे ९०६८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने जात होता. प्रवासादरम्यान अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन वेगाने घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये जाऊन पडले.अपघाताची माहिती मिळताच त्याला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. शिवाजी हा सध्या कामानिमित्त कासारी फाटा येथे वास्तव्यास होता. या घटनेबाबत राहुल भास्कर जाधव (वय २६, रा. कासारी फाटा, मूळ रा. तलवाडा, ता. गेवराई) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस हवालदार संदीप इथापे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.