शिरूर : ‘नोटा नकली…’ असल्याचे म्हणत हातचलाखी करून १९ हजार केले लंपास

शिरूर : शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील बँक ऑफ इंडिया या बॅंकेच्या शाखेमध्ये हातचलाखी करत १९ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. अभिमन्यू कांबळे यांनी दि. ०५ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजता आपल्या खात्यातील ५० हजार रुपये कॅश काढली. कॅश काढल्यानंतर शेजारील व्यक्तीने या बंडलमधील नोटा नकली आहेत, मी चेक करून देतो, अशी बतावणी केली.
त्यानंतर हातचलाखी करत बंडलमधील १९ हजार रुपये लंपास केले आहे. याबाबत अज्ञात विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखला झाला आहे. सविस्तर माहिती अशी की, अभिमन्यु शंकरराव कांबळे(वय ६९ वर्षे ) व्यवसाय सुखवस्तु, रा. आंबळे, ता. शिरूर हे न्हावरा ता. शिरूर गावातील बँक ऑफ इंडियामध्ये कॅश काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेमधुन ५० हजार रूपये काढले आणि बँकेमध्ये असलेल्या बॅचवर पैसे मोजत होते.
त्यादरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी येऊन बसला व ‘या पैशामध्ये नकली नोटा आहेत मी चेक करून देतो’, असे म्हणून त्यांच्याकडील ५० हजार रूपये घेतले आणि त्यामधील १९ हजार रुपये हातचलाखीने लंपास केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. थेउरकर हे करत आहेत.




