प्रभात वृत्तसेवा शिर्डी – शहरात स्थानिक नागरिक आणी भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या पिंपळवाडी रोडलगतच्या माऊलीनगर परिसरात नागरी वस्तीत बुधवारी रात्री बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या नागरी भागातील रस्त्यांवर मुक्त संचार करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याने परिसरातील नागरिकांसह शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याचे काही स्थानिकांनी बघितले. बिबट्या की अन्य प्राणी होता याची खातरजमा करण्यासाठी नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्या शांतपणे रस्त्यालगत फिरत असल्याचे दिसून आले. ही माहिती पसरताच काही तरुणांनी हातात टॉर्च घेऊन परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र, बिबट्या काही क्षणातच अंधारात अदृश्य झाल्याने शोधमोहीम निष्फळ ठरली. सुदैवाने कोणतीही अनर्थ घटना घडली नाही. या प्रकारानंतर परिसरातील नागरिकांत भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर हालचाल कमी करण्याचे तसेच एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेषत: भाविकांची सततची ये-जा असलेल्या या मार्गावर असा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाला घटनास्थळाची माहिती देण्यात आली असून, पिंपळवाडी रोड परिसरात गस्त वाढवणे, सापळे लावणे, रात्रीच्या वेळी अतिरिक्त पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.