टोकियो : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी तेत्सुया यामागामी याने आज न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली. दिनांक ८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये नारा इथे निवडणूक प्रचारसभेदरम्यान यामागामीनं शिंजो अबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला होता आणि युनिफिकेशन चर्चकडे तसेच राजकीय नेत्यांशी असलेल्या त्यांच्या संबंधांकडे लोकांचे लक्ष वळले होते. आज यामागामीची पहिली सुनावणी होती. त्याची आई युनिफिकेशन चर्चची अनुयायी झाल्यामुळे युनिफिकेशन चर्चबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला होता. अबे यांच्यावर गोळी झाडल्यामुळे लोकांचं लक्ष या गटाकडे वळेल आणि त्याच्यावर टीका होईल, अशा विचारातून त्याने हा हल्ला केला होता, असे सरकारी वकिलांनी या सुनावणीत सांगितले.