मुंबई: शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण जिल्ह्यांसाठी ‘निवडणूक प्रभारीं’ची मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांवर आणि विद्यमान आमदारांवर ही मोठी जबाबदारी सोपवून शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची कंबर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी शिवसेनेचे (शिंदे गट) सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी दमदार नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे: चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, येवला, सटाणा या नगरपरिषदांसाठी आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे आणि माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनमाड आणि नांदगाव नगर परिषदेसाठी या भागातील आमदार आणि पक्षाचे प्रभावी नेते आमदार सुहास कांदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सिन्नर, भगुर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते विजय करंजकर यांची नेमणूक झाली आहे. या नियुक्त्यांपूर्वीच आमदार सुहास कांदे यांच्याकडे ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा’ ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्थानिक निवडणुका लक्षात घेऊन पक्षात प्रथमच अशा प्रकारच्या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी प्रभारी निश्चित जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही शिंदे गटाने प्रभावी नेत्यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे: जिल्हा नगरपरिषद/नगरपंचायत नियुक्ती केलेले प्रभारी जळगाव वरणगाव, भुसावळ, धरणगाव, नशिराबाद गुलाबराव पाटील जळगाव भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव न.प. व शेदुर्णी न.पं. आमदार किशोर पाटील जळगाव चोपडा, फैजपूर, यावल आमदार चंद्रकांत सोनवणे जळगाव एरंडोल, पारोळा आमदार अमोल पाटील जळगाव रावेर, सावदा न.प. व मुक्ताईनगर न.पं. आमदार चंद्रकांत पाटील जळगाव अमळनेर आमदार शिरीष चौधरी नंदुरबार शाहदा, नंदुरबार, नवापूर, तळोदा आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार शिरीष चौधरी धुळे दोंडाई-वरवाडे, शिरपूर, पिंपळनेर, शिंदेखेडा न.पं. आमदार मंजुळा गावित या नियुक्त्यांवरून स्पष्ट होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला असून, अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर विजयाची धुरा सोपवण्यात आली आहे.