Devendra Fadnavis : शिंदेसेनेला धक्का! ‘मातोश्री’वरून मध्यरात्री फडणवीसांना फोन; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis : या संपूर्ण प्रकरणाला खरी कलाटणी मध्यरात्री मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मातोश्री’ निवासस्थानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला.

Devendra Fadnavis : देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत सध्या मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील मोक्याच्या जमिनी आणि महत्त्वाच्या प्रकल्पांशी संबंधित चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामागे ‘मातोश्री’वरून झालेल्या मध्यरात्रीच्या फोन कॉलची चर्चा रंगली आहे.
मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर गंभीर आरोप केले. मुंबई महापालिकेच्या सुधारणा समितीच्या माध्यमातून मोक्याच्या जागा आणि महत्त्वाच्या सेवा खासगी हातात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. सेव्हन हिल्स रुग्णालय, उपनगरीय रक्तपेढ्या, वांद्रे रिक्लमेशन आणि मलबार हिल ग्रीन झोन या चार महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच सुधारणा समितीवर सध्या शिंदे गटाचे वर्चस्व असून, या समितीच्या माध्यमातून मोठ्या बांधकाम प्रकल्पांना आणि पायाभूत सुविधांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे या प्रस्तावांबाबत राजकीय वातावरण अधिकच तापले.
मात्र, या संपूर्ण प्रकरणाला खरी कलाटणी मध्यरात्री मिळाली. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘मातोश्री’ निवासस्थानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला. ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या चारही प्रस्तावांमधील कथित त्रुटी आणि अनियमिततेची माहिती दिली.
हेही वाचा : Shamita Shetty: ‘लग्न करून नेमकं काय मिळवलं?’; ट्रोलर्सना शमिता शेट्टीचं सडेतोड उत्तर
मुंबईच्या हिताचा मुद्दा लक्षात घेऊन या प्रस्तावांना तातडीने स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली. या फोननंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हालचाली सुरू करत भाजपच्या नेत्यांकडून आणि नगरसेवकांकडून या प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अखेर फडणवीस यांनी रात्रीच या चारही वादग्रस्त प्रस्तावांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटात अंतर्गत मतभेद
या घडामोडीत आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला. उपनगरीय रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याच्या भूमिकेला शिंदे गटातीलच एका नगरसेवकाने पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
दरम्यान, ठाकरे गट आणि फडणवीस यांच्यात पडद्यामागे सुरू असलेल्या समन्वयामुळे मुंबई महापालिकेच्या आगामी राजकारणात नवीन समीकरणे तयार होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Ramdas Athawale : बकरी ईदच्या कुर्बानीवरुन भाजप आक्रमक, रामदास आठवले म्हणतात “भारतात आधी सगळे…”





