Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल सायंकाळी दिल्लीत जावून भेट घेतली. शिंदे आणि शाह यांच्यात ५० मिनिटे चर्चा झाली असून, शिंदेंनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला, अशी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील मंत्र्यांच्या रंगलेल्या नाराजी नाट्यानंतर ही भेट अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अॅापरेशन लोटस राबविले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रणनिती आखली जात आहे. अनेक बडे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना गळाला लावले जात आहे. त्यामुळे भाजपचे बळ वाढत आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यातच भाजपने मोहिम राबवत दीपेश म्हात्रे यांच्या हाती कमळ दिले आहे. तर कल्याण-डोंबवली येथूनही भाजपने डॅा. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात अनेक मोठ्या नेत्यांचे एकमागून एक प्रवेश केल्याने शिंदे पिता-पुत्राची कोंडी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याशिवाय राज्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारे नगरसेवक पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिले जात आहे. यामुळे शिवसेना शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजी सूर पसरला असल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती आली होती. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी दिल्लीत जावून अमित शाहांची भेट घेणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. या भेटीत शिंदेंनी भाजपच्या याच कृत्यावरुन शाहांपुढे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. माझं या सगळ्यावर लक्ष आहे, असं अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना सांगितले असल्याचे बोलले जात आहे. शाहांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले? मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे, असे विधान एकनाथ शिंदेंनी केले. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी राज्यातील महायुतीच्या वादावर दिली. मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीत नव्हताचं, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील ‘ऑपरेशन लोटस’वरुन अमित शाहांसमोर नाराजी व्यक्त केली. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडतात. मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीलासोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. हेही वाचा : satara news: एकजुटीने काम करून विजय मिळवावा: खासदार उदयनराजे