मुंबई – भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ‘महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातींवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली होती. “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर आता शिंदे गटातील नेत्यांकडून अनिल बोंडेवर टीका करण्यात येत आहे, अशात माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही Who is Anil Bonde ? असं असा प्रश्न विचारत घणाघात केला आहे.
विजय शिवतारे म्हणाले,’ हू इज अनिल बोंडे? तसेच बोंडे यांनी लायकीत राहावं अनिल बोंडे यांची उंची किती आहे? अनिल बोंडे असं बोलले असेल आणि एकनाथ भाई शिंदे यांचा संदर्भ घेत बोलले असेल तर हे चुकीचं आहे. ते पुढे म्हणाले, अनिल बोंडे आणि मी मंत्री होतो. तेव्हा तेही मंत्री होते. त्यांची इमेज आणि बुद्धी काय हे मला माहीत आहे. त्यांनी असं विधान केलं असेल तर दुर्देवी आहे. कुणी टीका करावी याला महत्त्व असतं. कुणी उठसूट टीका करेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. टीका तेवढ्या ताकदीच्या माणसाने केली असेल तर उत्तर दिलं पाहिजे. समज गैरसमज दूर केले पाहिजे’ असं म्हणत त्यांनी घणाघात केला आहे.
तत्पूर्वी, अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत म्हंटले होते की, “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेने त्यांना स्वीकारले आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटत आहे. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही.”
“उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि जनतेचं मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही,” असेही अनिल बोंडे म्हणाले होते.