हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तत्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून
आंदोलकांना दिला. हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे. यवतमाळच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना येथे खासदार पाटील आले असता त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी आपण दिल्ली येथे खासदारांची बैठक बोलाविली आहे. मात्र, मराठा बांधवांची मागणी असेल तर एक मिनिटात राजीनामा देतो व लागलीच लोकसभा अध्यक्षांच्या नावे आपला राजीनामा लिहिला. तसेच, पुढील दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.
सांगलीत आज उपोषण
सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांची भेट घेत आरक्षणाबाबत जाब विचारला होता.