Ashish Shelar on Shivsena – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख धर्मवीर असा न करता स्वराज्यरक्षक असा करावा अशी मागणी केली होती. पवार यांच्या याच विधानावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप व समविचारी राजकीय पक्षांकडून देखील अजित पवार यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. अशातच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विट करत यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळी टीका करताना शेलार यांनी, उद्धव ठाकरे यांचा गट असा उल्लेख न करता ‘शिवसेना’ असा उल्लेख केल्याने शिंदे गटातून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.
एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी, बंड पुकारल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा वारंवार केला आहे. सध्या खरी शिवसेना कोणती हा वाद निवडणूक आयोगाच्या दरबारी सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी देखील आपल्यासोबत असलेला शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा दावा अनेकदा केला आहे.
मात्र असं असताना देखील उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करताना आज आशिष शेलार यांनी, ठाकरे गटाला ‘शिवसेना’ संबोधले आहे. शेलार यांनी ठाकरे गटाचा उल्लेख ‘शिवसेना’ असा केल्याने, ठाकरे गटाकडून शिंदे व त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असून येथे भाजप व एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र लढणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. असं असताना देखील शेलार यांच्याकडून, ठाकरे गटाचा ‘शिवसेना’ असा केलेला उल्लेख जाणूनबुजून की अनावधानाने झालाय याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Ashish Shelar on Shivsena )
आमदार लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवणार