ठाकरे गटावर शिमगा! सेनेच्या कार्यालयातील फोटो काढले

नवी दिल्ली (वंदना बर्वे) – जुने मतभेद आणि वैमनस्य विसरून मैत्रीचा हात पुढे करण्याचा सण असणाऱ्या होळीच्या ऐन तोंडावर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाचा शिमगा झाला आहे. संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातील उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो शिंदे गटाच्या खासदारांनी काढून टाकले आहेत. उध्दव ठाकरे यांच्या फोटोच्या ठिकाणी आनंद दिघे यांचा तर आदित्य ठाकरे यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहेत.
सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री शिंदे गटाला दिल्यानंतर शिंदें समर्थक खासदारांनी राजधानीत आक्रमक भूमिका घेत, कार्यलयातील फोटो हटवून ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. रंगांचा सण होळीच्या ऐन तोंडावर ही घडामोड घडल्यामुळे ठाकरे गटाचा शिमगा झाला अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही सर्जीकल स्ट्राईक शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
लोकसभा सचिवालयाच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावे अलिकडेच एक पत्र काढले होते. या पत्रानुसार, संसदेच्या तिस-या माळ्यावरील 128 क्रमांकाचे कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत प्रतिनिधीत्व असलेल्या राजकीय पक्षांना संसदेत कार्यालय दिले जाते. 14 जानेवारी 2023 रोजी राहुल शेवाळे यांना शिवसेनेचे गटनेते म्हणून मान्यता देण्यात आली होती.




