Shikrapur News – सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरिक पाणी टंचाईला सामोरे जात असताना, शिक्रापूर ग्रामपंचायतच्या जलपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. शासनाच्या कोट्यावधी रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या या पेयजल योजनेच्या पाइपलाइनला कासारी फाटा परिसरात भगदाड पडल्याने पाण्याचा अपव्यय होत असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. शिक्रापूर ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने कोंढापुरी येथील तलावातून पाइपलाइनद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या ही पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐन दुष्काळात पाण्याचा असा अपव्यय होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने गळती रोखावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. शिक्रापूर येथील पाणी पुरवठा योजनेची पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळाली असून ग्रामपंचायतमार्फत पाहणी करून तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र देऊन दुरुस्ती केली जाईल. शिवाजी शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी