Shikrapur News – कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ग्रामपंचायतीने सणसवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये कचरा साठवण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी साठवल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्रापूरचा कचरा सणसवाडीत नको, अशी ठाम भूमिका घेत उद्योजक राजेश भुजबळ यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि दोन्ही ग्रामपंचायतींना निवेदन दिले आहे.शिक्रापूर ग्रामपंचायतीने जमा केलेला ओला व सुका कचरा सणसवाडीतील एका गोडाऊनमध्ये साठवून त्याचे वर्गीकरण केले जाते व पुढील प्रक्रियेसाठी तो पुणे महानगरपालिकेकडे पाठवला जातो. मात्र, कचरा कुजल्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरात विविध आजार पसरण्याची शक्यता राजेश भुजबळ यांनी वर्तविली आहे. यापूर्वीही सणसवाडी ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही तोडगा न निघाल्याने त्यांनी आता प्रशासनाकडे दाद मागितली आहे.सणसवाडीतील हे साठवणूक केंद्र तात्काळ बंद करून गोडाऊनला सील लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.भविष्यात पुन्हा या ठिकाणी कचरा साठवल्यास गोडाऊन मालक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. जर या कचऱ्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आली नाही,तर भविष्यात सदर कचरा स्वखर्चाने उचलून सणसवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेऊन टाकण्याचा इशाराही राजेश भुजबळ यांनी दिला आहे. या प्रकरणावरून सणसवाडी आणि शिक्रापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाची भूमिका शिक्रापूर येथील कचरा गोडाऊन हे सणसवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये असून, त्याबाबत प्रदूषण महामंडळाकडे यापूर्वीच कागदपत्रे दिलेली आहेत. तसेच गोडाऊनचा रितसर भाडेकरारही आहे. सध्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सणसवाडी ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याची माहिती शिक्रापूरचे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.