प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर परिसरात औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढत असून, शेजारील अनेक गावांमध्ये लहान-मोठ्या कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र, या परिसरात एकही अग्निशमक केंद्र उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शिक्रापूर औद्योगिक परिसरात तातडीने स्वतंत्र अग्निशमक केंद्र असणे काळाची गरज आहे. शिक्रापूर गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, करंदी, कोंढापुरी, तळेगाव ढमढेरे या परिसरात कंपन्यांचे जाळे वाढत आहे. अनेक ठिकाणी आग लागून दुर्घटना घडत आहेत, पण औद्योगिक क्षेत्रात अद्याप कोणत्याही प्रकारची अग्निशमक दलाची व्यवस्था नसल्याने नागरी वस्तीसह औद्योगिक आस्थापनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागात आग लागल्यास ३० ते ४० किलोमीटर दूर असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा रांजणगाव गणपती येथील अग्निशमक दलाला बोलवावे लागते. त्यांना वेळेवर मदत न मिळाल्यास मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते आणि मनुष्यहानीचा धोकाही असतो. त्यामुळे पुढील धोके लक्षात घेऊन शिक्रापूर परिसरात स्वतंत्र अग्निशमक केंद्र उभे करणे अत्यावश्यक झाले आहे. औद्योगिक विभागात धोका शिक्रापूर परिसरातील कोंढापुरी व सणसवाडी येथील औद्योगिक विभागात हजारो कामगार कार्यरत आहेत. येथे प्लास्टिक, रासायनिक पदार्थांसह अन्य ज्वलनशील वस्तूंचा वापर असणाऱ्या अनेक कंपन्या असल्याने औद्योगिक सुरक्षा नियमांनुसार अशा ठिकाणी तातडीने अग्निशमक यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक आहे. स्थानिक उद्योजकांनी अनेकदा प्रशासनाला या धोक्याची जाणीव करून दिली आहे. मागणी व उपाययोजना शिक्रापूर औद्योगिक परिसरात आगी लागून गंभीर परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिक आणि औद्योगिक संघटनांनी प्रशासनाकडे शिक्रापूर किंवा सणसवाडी या मध्यवर्ती ठिकाणी २४ तास कार्यरत असणारे अग्निशमक केंद्र स्थापन करण्याची मागणी केलेली आहे.