प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या वतीने आयोजित पुरुष व महिला गटासाठीची आंतरमहाविद्यालयीन रोड सायकलिंग स्पर्धा २०२५ नुकतीच उत्साहात पार पडली. युवकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी यशोधरा मधुकर शेरकर, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अमेय काळे, छत्रपती पुरस्कारप्राप्त सायकलपटू प्रतिभा लोणारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज गुप्ता, उपप्राचार्या प्रा. बैनाडे मंगल, महाराष्ट्र सायकलिंग प्रशिक्षक बिरू भोजने, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धर्मेंद्र लांबा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या पुरुष गटात महात्मा फुले कॉलेज पिंपरी येथील सिद्धेश पाटील याने प्रथम, विरेंद्र पाटील याने द्वितीय, तर आर. जे. एस. पी. एम. कॉलेज भोसरीच्या केशव मोरे याने तृतीय क्रमांक पटकाविला. महिला गटात व्ही. पी. एम. बी. ए. बारामतीची राधिका दराडे प्रथम आली, तर ए. सी. एस. कॉलेज नारायणगावची प्रियांजली सिंग हिने द्वितीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या खेळाडूंना कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पलांडे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सायकलिंगला चालना मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल पलांडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय काळे आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.