Shikrapur Fire – येथील तळेगाव ढमढेरे रस्त्यावर असलेल्या मांढरे कॉम्प्लेक्सला ६ मे रोजी पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत उपासना सुपर मार्केट, आंबेकर इलेक्ट्रिकल्स आणि श्रीगणेशा ऑटोमोबाइल्स ही तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. विशेषतः ऑटोमोबाइल्सच्या दुकानातील दहा दुचाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. शेजारील हॉटेलमधील गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर वाघोली आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे अग्निशमन दलाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. महेंद्र माळी, किशोर गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत किराणा दुकानातील फ्रीज, इलेक्ट्रिकल्स दुकानातील साहित्य आणि दहा दुचाक्यांसह इतर मौल्यवान वस्तू जळून कोळसा झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि सहकारी अधिक तपास करत आहेत