प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – धामारी (ता. शिरूर) आणि शेजारील मुखई गावामध्ये एकाच मालकीच्या दोन सराफी दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर आणि खिडकीचे गज उचकटून आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धामारी आणि मुखई येथे रमेश महामुनी यांचे लक्ष्मीनारायण ज्वेलर्स नावाचे दुकान असून ही दोन्ही दुकाने रमेश व त्यांची मुले चालवतात. २ जानेवारी रोजी रात्री दोन्ही दुकाने नेहमीप्रमाणे बंद करून सर्वजण घरी गेले होते. दरम्यान, ३ जानेवारी रोजी सकाळी दोन्ही ठिकाणच्या दुकानांचे शटर व खिडकीचे गज उचकटलेले असल्याचे शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती महामुनी कुटुंबाला दिली. मालकांनी दोन्ही दुकानांत जाऊन पाहणी केली असता, धामारी येथील दुकानातून तीन किलो चांदीचे दागिने आणि मुखई येथील दुकानातून अर्धा तोळा सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गणेश रमेश महामुनी (वय ३९, रा. वृंदावन सोसायटी, शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे करत आहेत.