प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एका सोनाराला बेन्टेक्सचे दागिने खरे असल्याचे भासवून त्यांची लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवकर ज्वेलर्सचे संचालक रामदास देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसात अभिजित बंडू गदळे आणि राहुल अर्जुन मोरे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट होलमार्क आणि बनावट पावत्यांचा वापर करून हा फसवणुकीचा प्रकार करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपी अभिजित गदळे (रा. केसनंद, हवेली) व राहुल मोरे (रा. डिंग्रजवाडी, शिरूर) हे दोघे रामदास देवकर यांच्या ज्वेलर्समध्ये आले. त्यांनी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पंधरा दिवसांसाठी गहाण ठेवले आणि त्याबदल्यात प्रत्येकी ९० हजार असे एकूण १ लाख ८० हजार रुपये घेतले. महिना उलटून गेल्यानंतरही दोघे पैसे परत करण्यासाठी न आल्याने देवकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने देवकर यांना संशय आला. रामदास देवकर यांनी त्यांनी गहाण ठेवलेले दागिने तपासले असता, ते दागिने सोन्याचे नसून बेन्टेक्सचे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी दागिन्यांवर बनावट होलमार्क लावून आणि बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी रामदास नामदेव देवकर (वय ५६, रा. कोरेगाव भीमा) यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश कुदळे करत आहेत.