Shikrapur Accident – पुणे-नगर महामार्गालगत हॉटेल कम्फर्ट इन समोर बुधवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रक चालकासह अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. जयराम दत्तात्रय शिंगाडे (वय ४६, रा. शिंगाडवाडी, ता. शिरूर) असे मृत कार चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर एमएच १६ सीडी ७९६४ या ट्रकचा बिघाड झाल्याने चालकाने तो रस्त्यावर उभा करून दुरुस्तीचे काम सुरू केले होते. दरम्यान, पुणे बाजूने अहिल्यानगरकडे जाणाऱ्या एमएच १२ एसएल ४१९४ या कारवरील चालक जयराम शिंगाडे यांचे नियंत्रण सुटल्याने कार उभ्या ट्रकच्या पाठीमागील बाजूला जोरात धडकून खाली शिरली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. यावेळी ट्रकचे काम करणारे चालक अलीम सय्यद आणि शुभम पवार हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे व विकास कारखिले यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात कार चालक जयराम शिंगाडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी ट्रक चालक अलीम हकीब सय्यद (वय ४९, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) आणि शुभम बाबासाहेब पवार (रा. अहिल्यानगर) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजाराम दत्तात्रय शिंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ट्रक चालक अलीम सय्यद विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करत आहेत.