शेवगाव तालुका खेलरत्नांची खाण – माजी आमदार नरेंद्र घुले

शेवगाव – शेवगाव तालुक्याने जिल्हा, राज्यच नव्हे तर देश-विदेश पातळीवर गेलेले कबड्डी, खो-खो कुस्ती अशा विविध क्रीडा क्षेत्रात नामवंत खेळाडू घडविले आहेत. या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र संपन्न केले. जिद्द, कष्ट आणि ध्येयाने प्रेरित होऊन खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले तर यश दूर नसते.
जीवनात व्यसनावर मात करायची असेल तर खेळासारखा उत्तम पर्याय नाही. एखादा युवक खेळाच्या नादी लागला तर त्याच्या नादी लागण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले .
चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळाच्यावतीने पंचक्रोशीतील गुणवंत खेळाडूंचा सन्मान सोहळा शनिवारी येथील साईलॉन्स मध्ये पार पडला . यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ.क्षितीज घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, जालन्याचे पोलीस उपअधीक्षक शाम पवार आदी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी खुरांगे म्हणाले,गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना समाजाचेही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असून गावोगावी क्रीडा क्लब स्थापन होऊन क्लब संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे. खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल निर्माण करून त्यात विविध सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाचा क्रीडा विभाग प्रयत्नशील असून. समाजातील क्रीडाप्रेमींनी त्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय खेळाडू संजय फडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अरुण पाटील लांडे, संजय कोळगे, कल्याण नेमाणे, नंदू मुंढे , रामनाथ राजपुरे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर आदींसह क्रीडा प्रेमीची मोठी उपस्थिती होती.
सध्या पॅरिस ऑलंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधत्व करत असलेला दहिगावनेचा भूमिपुत्र श्रीकांत जाधव याचे पालक दत्तात्रय जाधव, किक्रेटपटू ऋषिकेश दौंड, पैलवान ऋषिकेश जोशी, निवृत्त पोलीस अधिकारी अल्ताफ शेख, शंतनू पांडव, प्रशांत नाकाडे, विजय निकित, प्रकाश बोरुडे, युवराज बारवकर, वैष्णवी फलक, स्वाती हागे, रावसाहेब शित्रे, रऊफ शेख यांचेसह तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील आजी-माजी खेळाडूंचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडाशिक्षक एकनाथ शिरसाठ, राजेंद्र दौड, माजी सभापती डॉ.घुले, कबड्डीपटू फिरोज पठाण आदींची भाषणे झाली .
भाऊला कॅप्टन करायचे
माजी आमदार डॉ.नरेंद्र पाटील घुले यांनी आपल्या कार्यकाळात शेवगाव येथे अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी केली. परिसरातील खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र, सध्या हे क्रीडा संकुल अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. एकप्रकारे खेळाडूंचा त्यातून अवमान होत असल्याने जिल्हा क्रीडा विभागाने शेवगावचे क्रीडा संकुल अतिक्रमण मुक्त करावे, अशी मागणी केली. येत्या १५ ऑक्टोबरला आपणास एका मोठ्या सामन्याला सामोरे जायचे आहे. ७५ दिवस बाकी आहेत. आपणास कॅप्टन चंद्रशेखर भाऊला निवडून सर्व कामे सांगायची आहेत, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.





