शेवगाव सायकल क्लबची पंढरपूर वारी पर्यावरण व शरीर तंदुरुतीचा संदेश

शेवगाव – शेवगाव सायकल क्लबच्या सदस्यांनी पहाटे तीनलाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंढरपूर वारीसाठी प्रस्थान केले. तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी वारीला हिरवा झेंडा दाखविला .
“देखणा है कल ,तो सायकल चलाओ “; “सायकल चालवा , पर्यावरण वाचवा ;” अशा घोषणा देत शेवगाव सायकल क्लबच्या सदस्यांनी पहाटेच्या रम्य वातावरणात श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रयाण केले. आज एकाच दिवसांत टेंभूर्णी मुक्काम करून ७ जुलै रोजी पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, नगर प्रदक्षिणासह भव्य सायकल रिंगण सोहळा होऊन वारीची सांगता होणार आहे.
शेवगाव सायकल क्लबच्या वतीने आयोजित पंढरपूर सायकल वारीचे हे तिसरे वर्ष असून, या वारीमध्ये वय १३ ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ सदस्य डॉक्टर्, शिक्षक, सरकारी कर्मचारी, केमिस्ट अशा विविध व्यावसायिकांसह एकूण तीन महिलासह ४२ जण सहभागी झाले आहेत. यापूर्वीही या क्लबने नर्मदा परिक्रमा, अयोध्या वारी, स्टॅचू ऑफ युनिटी, तुळजापूर, शेगाव, शिर्डी, शिवनेरी किल्ला अशा अनेक वाऱ्यांचे यशस्वी आयोजन केले आहे. शेवगावचे सुपुत्र तहसीलदार संतोष काकडे यांच्या ग्रुपने सायकलवर काश्मीर ते कन्याकुमारी असा यशस्वी प्रवास केला आहे.





