इंदापूर : महाराष्ट्राच्या शेतकरी राजकारणात एकेकाळी एकत्रितपणे आंदोलनांची धुरा सांभाळणारे आणि नंतर राजकीय मतभेदांमुळे दोन टोकांवर गेलेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही दिग्गज नेते शुक्रवारी (दि. २२) इंदापूर न्यायालयात तब्बल १४ वर्षांनंतर एकाच टेबलावर एकत्र बसल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयीन कामकाजानंतर दोघांनी एकत्र चहाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. २०११ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्याच्या खटल्यासाठी दोन्ही नेते इंदापूर न्यायालयात हजर झाले होते. त्या आंदोलनाच्या काळात शेतकरी प्रश्नांवर दोघेही एकत्र लढत होते. मात्र, पुढे राजकीय मतभेद वाढत गेल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर थेट टीका करणारे हे नेते मात्र जुन्या मैत्रीच्या आठवणीत रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, यापूर्वीही खटल्याच्यानिमित्त दोन्ही नेते इंदापूर न्यायालयात आले होते. मात्र त्यावेळी त्यांनी एकमेकांकडे पाहणेही टाळल्याची चर्चा रंगली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांनी एकत्र चहाचा आस्वाद घेत ‘चाय पे चर्चा’ केली. न्यायालय परिसरात उपस्थित कार्यकर्ते, वकील आणि नागरिकांनी हा प्रसंग उत्सुकतेने पाहिला. यावेळी बोलताना राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी ही भेट केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारी असल्याचे स्पष्ट केले. “आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,” अशी प्रतिक्रिया दोघांनी दिली. दरम्यान, राज्याच्या शेतकरी राजकारणात प्रभाव असलेल्या या दोन नेत्यांच्या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना वेग आला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. हेही वाचा : Pune District : जिल्ह्यात वादळी वारा, गारपिटीने दैना