लाखणगाव, (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) गावच्या हद्दीमध्ये अष्टविनायक महामार्गावर शेपू भाजी रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला फेकून देऊन अज्ञात शेतकऱ्र्याने संताप व्यक्त केल्याचे दिसून येते. सध्या पालेभाज्यांमध्ये शेपू पिकाचे बाजार भाव गडगडल्याने अनेक वेळा विक्री मार्केटमध्ये होत नसल्याने मार्केटला गेलेला शेतकरी ही भाजी रस्त्यातच टाकून देऊन नाराजी व्यक्त करीत घरी जात आहे. बाजार भाव घसरल्याने शेपू भाजी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. पारगाव (शिंगवे) गावच्या हद्दीमध्ये अष्टविनायक महामार्गावर शेपू भाजी रस्त्यात टाकली आहे. सध्या अनेक तरकारी पिकांना बाजार भाव चांगले आहेत. परंतु पालेभाज्यांचे बाजार भाव हे होणारा पाऊस, निसर्गचक्र आणि आवक यगवर अवलंबून असतात. सध्या कोथिंबिरीला ३००० रुपयेपर्यंत, मेथीला १००० ते १५०० पर्यंत तर शेपूला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा बाजार भाव मिळत आहे. परंतु सध्या शेपूचा बाजारभाव कमी असल्याने काही शेतकऱ्यांची शेपू भाजी विकली जात नाही. त्यामुळे अशावेळी हे शेतकरी रस्त्यावरच फेकून संताप व्यक्त करत आहे. तर काही शेतकरी गाडीतच शेपू भाजी ठेवून मार्केटला विक्री करतात. नाही तर गाडी कुठेतरी रिकामी करून घरी जात असतात. मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करून शेतकरी शेपू भाजी घेत असतो. परंतु बाजारभाव नसल्याने हा भाजीपाला त्याला ओतून द्यावा लागतो. या गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे.परंतु ही शेपू रस्त्यातच ओतू नये, त्याचा त्रास वाहनचालकांना होत असतो. त्यामुळे या गोष्टीचा विचार शेतकरी वर्गाने केला पाहिजे. जनावरांना खाऊ घाला… पारगाव शिंगवे तालुका आंबेगाव या ठिकाणी अष्टविनायक महामार्गावर रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला शेतकऱ्यांनी शेपू भाजी फेकून दिल्याने याचा त्रास नागरिकांना होत असून पावसाच्या दिवसात शेपू सडल्यानंतर गाड्या घसरण्याचा प्रकार होतो. रस्त्यावर शेपू भाजी रस्त्यावर फेकून देण्याऐवजी जनावरांना दिली, तरी चालेल, असे मतही काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.