वाघोली : लॉकडाऊनच्या काळामध्ये घरातून गावाला पायी निघालेल्या स्थलांतरित तसेच इतर गरजू ९० कामगारांना वाघोलीतील कल्याण मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा छावणीत आसरा देण्यात आला आहे. महसूल, ग्रामपंचायत, पोलीस व दानशूर संस्था, व्यक्तींच्या मदतीने सर्वांच्या जेवणाची, पाण्याची, निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पुणे शहरामध्ये वास्तव्यास असणारे कामगार पुणे-नगर महामार्गाने पुढे जात होते. प्रशासनाच्या वतीने पायी जाणारे व गरजू कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा केंद्र उभारण्यासाठी सूचना देण्यात आल्या नंतर वाघोली येथील कल्याण मंगल कार्यालयात तात्पुरत्या निवारा छावणीची उभारणी करण्यात आली. छावणीमध्ये सुरुवातील कमी नागरिक होते. काही कालावधीनंतर पोलीस व प्रशासनाच्या वतीने ९० जणांना याठिकाणी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ६० पुरुष, २३ स्त्रिया, ७ लहान मुलांचा समावेश असून बहुतांश मध्यप्रदेश भागातील कामगार तसेच उत्तरप्रदेश, नांदेड, बीड भागातील कुटुंबे आहेत. महसूल, ग्रामपंचायत, पोलीस व दानशूर संस्था, व्यक्तींच्या मदतीने सर्वांच्या जेवणाची, पाण्याची, निवाऱ्याची सोय नियमितपणे केली जात आहे. सर्वांची प्रकृती देखील उत्तम आहे. याठिकाणी आमची जेवणाची, निवाऱ्याची चांगल्याप्रकारे सोय होत असल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. वाघोलीतील निवारा छावणी केंद्रामध्ये कामगारांच्या जेवणाची व्यवस्था नियमितपणे होत असते. समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था सर्व कामगारांसाठी सकाळचा चहा व नाष्ट्यासाठी मदत करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी मदत करावी समीर भाडळे, माजी उपसरपंच,ग्रामपंचायत वाघोली