Sheikh Hasina – शिक्षा सुनावल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी, हा निकाल पूर्वनियोजित असल्याचा दावा केला असून आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचे म्हटले आहे. हसीना यांनी न्यायालयाने केवळ आवामी लीगच्या सदस्यांवर खटला चालवला आहे. राजकीय विरोधकांनी केलेल्या कथित हिंसाचाराकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. न्यायालयाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची किंवा वकिलांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील उपलब्ध करुन दिली नाही. जगातील कोणताही आदरणीय किंवा कायदा पाळणारा व्यक्ती बांगलादेशात आयसीटीला पाठिंबा देणार नाही. येथील न्यायालयाचा वापर बांगलादेशच्या शेवटच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांना काढून टाकण्यासाठी आणि राजकीय शक्ती म्हणून अवामी लीगला संपवण्यासाठी केला जात आहे. सध्याचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या सैन्याने देशभरात प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आहेत. अवामी लीग नेते, कार्यकर्त्यांची शेकडो घरे, व्यवसाय आणि मालमत्ता लुटल्या आहेत, असा दावा देखील शेख हसीना यांनी प्रतिक्रिया देताना केला आहे. शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा : ५ ऑगस्ट २०२४ – जनआंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडून हसीना यांचे भारतात पलायन. ८ ऑगस्ट २०२४ – डॉ. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन १४ ऑगस्ट – आंदोलनातील जीवितहानीला जबाबदार असलेल्यांवर खटले चालवण्याची हंगामी सरकारची घोषणा ऑक्टोबर २०२४ – आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद- बांगलादेश पुन्हा कार्यरत १७ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय लवादाकडून शेख हसीना आणि अन्य ४५ जणांविरोधात अटक वॉरंट जारी. नोव्हेंबर २०२४ – डिसेंबर अखेरपर्यंत तपास पुर्ण करण्याचे लवादाचे आदेश फेब्रुवारी २०२५ – आंदोलनात किमान १,४०० जण ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्राचा निष्कर्ष १ जून २०२५ – लवादासमोरील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात. १९ जून – हसीनांच्या बाजूने बचाव पक्षाचे वकिल म्हणून एवाय मोपगउझ्झमान यांची नियुक्ती २ जुलै – हसीनांना त्यांच्या अनुपस्थितीत न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ६ महिन्यांची शिक्षा १० जुलै – हसीना, माजी गृहमंत्री असदुझ्झमान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्लाह अल-मामून यांच्यावर सामुदायिक हत्यांचे आरोप निश्चित ३ऑगस्ट – हसीनांच्या अनुस्थितीतच खटल्याची सुनावणी सुरू २३ ऑक्टोबर – खटल्याची सुनावणी पूर्ण १७ नोव्हेंबर – आंतरराष्ट्रीय लवादाकडून हसीना, कमाल आणि मामून दोषी. माफीचे साक्षीदार झालेल्या मामून यांना ५ वर्षांची शिक्षातर हसीना आणि कमाल यांना फाशीची शिक्षा.