Sheikh Hasina : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिन्यांची शिक्षा

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना आज आंतरराष्ट्रीय गन्हे लवादाच्या न्यायालयाने न्यायालयाच्या अवमान प्रकरणी 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आयसीटीच्या न्या. मोहंम्मद गुलाम मोर्तझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय न्यायालयाने हा निकाल दिला. शेख हसीना यांच्या फोनवरचे संभाषण गेल्या वर्षी सोशल मीडियावर उघड झाले होते. या उघड झालेल्या संभाषणाचा आढावा घेऊन हा निकाल सुनावण्यात आला. शेख हसीना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून एखाद्या प्रकरणात त्यांना सुनावण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा आहे.
गोबिंदगंज उपजिल्हा अधयक्ष आणि बांगलादेश छात्र लीग या बंदी घातलेल्या विद्यार्थी संघटनेचे नेते शकील आकांद बुलबुल यांच्याशी फोनवर बोलत असतानाचे संभाषण सोशल मीडियावर उघड झाले होते. आपल्याविरोधात २२७ प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत. त्यामुळे आपल्याला २२७ जणांच्या हत्येचा परवाना मिळाला असल्याचे या संभाषणादरम्यान हसीना यांनी फोनवर बोलताना म्हटले होते. हसीना यांनी केलेले वक्तव्य तिरस्कारयुक्त आणि न्यायालयाचा अवमान करणारे होते, असे निरीक्षण लवादाने नोंदवले आहे.
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी न्यायालयाने बुलबुल यांना देखील दोषी ठरवले असून त्यांना दोन महिन्यांची शिक्षा सुनावली असल्याचे बांगलादेशातील सरकारी वृत्तसंस्था असलेल्या बीएसएसने आपल्या बातमीमध्ये म्हटले आहे. हसीना आणि बुलबुल यांनी आत्मसमर्पण केल्यापासून किंवा त्यांना अटक झाल्यापासून त्यांची शिक्षा सुरू होल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान पद सोडून भारतात आश्रय घेतल्यानंतर हसीना यांच्याविरोधात बांगलादेशात अनेक खटले दाखल झाले आहेत. त्यांच्या आवामी लीग पक्षाच्या बहुतेक नेते आणि मंत्र्यांना एकतर अटक करण्यात आली आहे किंवा ते देशाबाहेर पळून गेले आहेत. यातील बहुतेकांवर विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप आहे.





