Shehzad Poonawalla Resignation : पंतप्रधानांचे कट्टर समर्थक शहजाद पूनावालांचा भाजपला रामराम? ; एक्स प्रोफाइलमधील बदलामुळे चर्चांना उधाण
Shehzad Poonawalla Resignation :

Shehzad Poonawalla Resignation : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्याबाबत राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील त्यांच्या प्रोफाइलमध्ये करण्यात आलेल्या बदलानंतर त्यांनी भाजपमधून राजीनामा दिल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
पूनावाला यांनी आपल्या एक्स प्रोफाइलमधून भाजपचा उल्लेख हटवला असून स्वतःची ओळख ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी’ अशी ठेवली आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, या बदलामागील कारणांबाबत त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक भूमिका स्पष्ट केलेली नाही.
दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, शहजाद पूनावाला यांनी वैयक्तिक कारणांमुळे भाजप नेतृत्वाकडे आपला राजीनामा सादर केला आहे. मात्र, भाजपकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसेच, पूनावाला यांनीही आपल्या राजीनाम्याबाबत सार्वजनिकरित्या कोणतीही पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे सध्या या चर्चांना अधिकृत आधार मिळालेला नाही.
शहजाद पूनावाला यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी पक्ष सोडला होता. भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. Shehzad Poonawalla Resignation :
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून सक्रिय राजकारणापासून दूर जाण्याचे संकेत मिळत होते. त्यांनी एक्सवर कोणत्याही कॅप्शनशिवाय आपल्या जुन्या मुलाखतींचे व्हिडिओ शेअर केले होते. त्या मुलाखतींमध्ये त्यांनी राजकारण, सार्वजनिक जीवन आणि समाजसेवेबाबतची भूमिका स्पष्ट केली होती.
जानेवारी 2025 मधील एका व्हिडिओत ते म्हणाले होते की, राजकीय उद्दिष्टे आणि निवडणुकीची उद्दिष्टे वेगळी असतात. खासदार किंवा आमदार न होता देखील समाज आणि देशासाठी योगदान देता येते. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गांनी देशसेवा करू शकते आणि राजकारण हे केवळ निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नसते, असे त्यांनी नमूद केले होते.
तसेच, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका ही सक्रिय राजकारणातील आपली शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतरही पश्चिम बंगाल, दिल्ली, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मात्र आता सार्वजनिक आणि राजकीय जीवनाच्या नव्या टप्प्याकडे वळण्याची वेळ आल्याचे संकेत त्यांनी दिले होते. Shehzad Poonawalla Resignation :
दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चांमुळे पूनावाला यांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता वाढली असली, तरी त्यांच्या राजीनाम्याबाबतचे चित्र अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.





