T20I Rankings : महिला क्रिकेट क्रमवारीत शेफाली अव्वल

लखनौ – भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आयसीसीच्या ताज्या महिला टी-20 क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी आली आहे. दक्षिण आफ्रिकेबरोबर सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये तिने पहिल्या दोन सामन्यात 23 व 47 धावा केल्या.
शेफालीने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अफलातून कामगिरी करत शेफालीने टी-20 क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा 40 व्या स्थानावर असून रिचा घोषने 59 स्थानांची झेप घेत 85 वे स्थान प्राप्त केले आहे.
फलंदाजांच्याच यादीत अष्टपैलू हरलीन देओलने 262 स्थानांची झेप घेत फलंदाजांच्या यादीत 99 तर, गोलंदाजांच्या यादीत 146 वे स्थान मिळवले आहे. भारताची डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड 25 व्या स्थानावर आली आहे.





