Shefali Shah : बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह आज ‘दिल्ली क्राइम’ सीजन 3 मधील दमदार अभिनयामुळे पुन्हा चर्चेत आहेत. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक निर्णय आजही त्या आठवतात अक्षय कुमारच्या आईची भूमिका स्वीकारणं. 2005 मध्ये रिलीज झालेल्या ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’ या चित्रपटात शेफालीने अक्षयची आई आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका केली होती. आता जवळपास 20 वर्षांनंतर त्या म्हणतात की हा निर्णय त्यांच्या करिअरसाठी मोठा धक्का होता. “मी माझीच कबर खोदली”… शेफालीचा खुलासा अलीकडे दिलेल्या मुलाखतीत शेफाली शाह यांनी सांगितलं की ही भूमिका करण्यापासून त्यांचे पती आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी त्यांना थांबवलं होतं. त्या म्हणाल्या, “माझ्या पतीने स्पष्ट सांगितलं, हे करू नकोस.” “अमिताभ बच्चन यांनीही म्हटलं होतं, ‘शेफालीला घेऊ नकोस, ती या भूमिकेसाठी योग्य नाही.” पण शेफाली यांनी हट्टाने ही भूमिका स्वीकारली. त्या म्हणतात, “मी मेकअप करून स्वत:ला वयस्कर दाखवून म्हणाले बघा, मी वयस्कर दिसू शकते. पण शेवटी मी माझीच कबर खोदली.” “ऑफर्स मिळायचंच बंद झालं” शेफाली सांगतात की या भूमिकेनंतर दीर्घकाळ त्यांना कोणत्याही मोठ्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, “माझ करिअर बराच काळ प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा, कामाची वाट पाहण्यातच गेल.” तरीही त्या आपल्या निवडक पण ताकदीच्या फिल्मोग्राफीवर समाधानी आहेत. ‘गांधी, माय फादर’, ‘द लास्ट लीयर’, ‘वन्स अगेन’, ‘थ्री ऑफ अस’ सारख्या चित्रपटांचा त्यांना अभिमान आहे. ‘वक्त’ मधील स्टार्स ‘वक्त’ हा चित्रपट आतिश कपाडिया यांच्या गुजराती नाटकावर आधारित होता. या चित्रपटात, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियंका चोपडा, शेफाली शाह, राजपाल यादव, बोमन इराणी असे अनेक कलाकार होते. दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केलं होतं. ‘दिल्ली क्राइम 3’ मध्ये पुन्हा दमदार भूमिका सध्या शेफाली ‘दिल्ली क्राइम सीजन 3’ मध्ये वर्तिका चतुर्वेदीची भूमिका पुन्हा साकारत आहेत. या सीझनमध्ये रसिका दुग्गल, आदिल हुसैन, राजेश तैलंग यांच्यासोबत हुमा कुरैशी खलनायिका ‘बडी दीदी’च्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.