प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – लग्न समारंभात नवरी मुलीची वरात घोड्यावरून काढली जाते हे आजवर आपण पाहिले आहे. परंतु, आता लग्नात नवरदेवासाठी घोडा आणून नाचवण्याचे काम देखील मुली करू लागल्या आहेत. हे सध्याच्या मुली कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, याचेच उत्तम उदाहरण आहे. भारत देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने सक्षम झाल्या आहेत. विमान सेवा, रेल्वे, जहाज चालवण्यापासून ते प्रशासकीय आणि पोलीस क्षेत्रातील उच्च पदांवर महिला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. तसेच, देशाचे नेतृत्वही महिला करत आहेत. एवढा मोठा बदल सध्या झाला असून, ग्रामीण भागातील मुलीसुद्धा शिक्षण घेऊन उच्च पद गाठण्यात मागे राहिलेल्या नाहीत. ग्रामीण भागातील मुली सक्षम झाल्या असून, अगदी लग्न समारंभातील वरातीतील घोडा नाचवण्यासारखी कामेही त्या करू लागल्या आहेत. म्हणूनच आज भारत देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला असून, यामध्ये पुरुषांबरोबर महिलांचाही बरोबरीचा वाटा आहे. खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता समाजामध्ये चांगल्या प्रकारे रुजू लागली आहे.