प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात महाराष्ट्र सरकारच्या वतीने काही उपक्रम राबवले जात असले, तरी या स्थळाचा जो अपेक्षित विकास व्हायला हवा होता, तो अद्याप झालेला नाही. या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व ओळखून शासनाने या परिसराचा जागतिक स्तरावरील शौर्य तीर्थाच्या रूपात विकास करावा, असे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले आहे. २०८ व्या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित होते.यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जोगेंद्र कवाडे म्हणाले की, विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटवली गेली पाहिजेत. या स्थळाचे सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक असून, राज्य सरकार आणि सामाजिक न्याय विभागाने येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी अधिक कायमस्वरूपी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. १९९६ पासून या ठिकाणी समाज बांधवांच्या प्रयत्नातून विविध सुविधा निर्माण झाल्या असून, आज केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून लाखो लोक येथे शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येतात, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समाजातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही कवाडे यांनी सांगितले. आजचा दिवस हा केवळ शूरवीरांच्या शौर्याला अभिवादन करण्याचा असल्याने आज राजकारण न करता केवळ मानवतेच्या मूल्यांवर चर्चा व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानानुसार हा देश माणुसकी आणि न्यायावर आधारित व्हावा, असा संकल्प या पवित्र ठिकाणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने केलेल्या यावर्षीच्या नियोजनाबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.