प्रभात वृत्तसेवा लोणीकंद – पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला 208 वा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता, सुव्यवस्था आणि उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्वांगीण तयारी केली असून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सूक्ष्म व काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही अनुयायांना असुविधा होऊ नये, यासाठी आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना, नागरिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या सूचनांचा विचार करूनच हे नियोजन करण्यात आले आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा केवळ कार्यक्रम नसून ऐतिहासिक व सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो शांतता, संयम आणि उच्च संस्कृतीचे दर्शन घडवणारा व्हावा, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले. आरोग्य, पाणी व स्वच्छता व्यवस्थेसाठी व्यापक तयारी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आरोग्य व स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 23 आरोग्य केंद्रे कार्यरत, 43 रुग्णवाहिका तैनात, 18 खासगी रुग्णालयांतील 286 खाटा आरक्षित, 155 प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, उपहारगृह व टँकरसाठी 33 तपासणी पथके, 80 घंटागाड्या, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 150 टँकर, पाणी भरण्याच्या ठिकाणी 200 कर्मचारी, 2 हजार 800 शौचालयांची उभारणी, 265 सफाई कामगार व 260 पर्यवेक्षण अधिकारी-कर्मचारी, महिला व बालकांसाठी 9 हिरकणी कक्ष, याशिवाय पेरणे, कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप रस्ता, ढरंगेवस्ती, कोरेगाव भीमा ते वाडेवस्ती या मार्गांवर रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली असून, पाणी भरण्याच्या ठिकाणी मुरुम टाकणे व शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये 1 महानिरीक्षक, 3 पोलीस उपमहानिरीक्षक, 20 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 8 राज्य राखीव पोलीस दल तुकड्या, 3 शिघ्र प्रतिसाद दल, 14 घातपात विरोधी पथके, 18 बीडीडीएस पथके, 650 होमगार्ड, 4 हजार 700 पोलीस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण सोहळ्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी 251 ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे (फेस रिकग्निशन प्रणालीसह) बसवण्यात आले आहेत. तसेच 19 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करून सुमारे 20 हजार चारचाकी वाहनांची पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.