प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणेफाटा (ता. हवेली) येथे १ जानेवारी रोजी २०८ वा शौर्यदिन साजरा होत असताना, विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातून मुस्लिम बांधव आल्याचे पाहायला मिळाले. देशभरातून लाखो समाज बांधव या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असताना, उत्तर प्रदेशातील आझमगड येथून आलेल्या मुस्लिम अनुयायांच्या उपस्थितीने सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. हे अनुयायी हातामध्ये निळे ध्वज घेऊन अभिवादन करण्यासाठी विजयस्तंभ परिसरात दाखल झाले होते.यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोहम्मद अदनान या अनुयायाने सांगितले की, ते गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने या ऐतिहासिक ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचा इतिहास प्रेरणादायी असून, येथील वातावरण उत्साही असते. प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांबद्दल त्यांनी यावेळी विशेष समाधान व्यक्त केले. तसेच, पुढच्या वर्षी आपण आपल्या कुटुंबासह आणि मोठ्या संख्येने मित्रांसह या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध जाती – धर्माचे लोक एकाच व्यासपीठावर येऊन महापुरुषांना आणि शूरवीरांना अभिवादन करत असल्याने या सोहळ्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. उत्तर प्रदेशाहून आलेल्या या बांधवांनी विजयस्तंभासमोर नतमस्तक होऊन सामाजिक समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला.