प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पेरणेफाटा येथील २०८ व्या शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमपीएलने केलेले संयुक्त नियोजन यशस्वी झाले. यंदाच्या वर्षी गर्दीचा ओघ २० टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवत प्रशासनाने शिक्रापूर आणि लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करून तेथून बसद्वारे प्रवासाची सोय केली होती. या उत्कृष्ट नियोजनामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विभागांच्या कामगिरीवर कौतुकाची थाप मारली आहे.महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित झाले होते. प्रशासनाने भाविकांना उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी बस थांब्यांवर छताची व्यवस्था केली होती. नगर बाजूकडे १० आणि चाकण बाजूकडे ५ असे स्वतंत्र बस थांबे उभारण्यात आले होते. पीएमपीएलच्या वतीने १२६० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याद्वारे अनुयायांना पार्किंग स्थळापासून विजयस्तंभ, वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी आणि गोविंद गोपाळ गायकवाड समाधी स्थळापर्यंत ने-आण करण्यात येत होती. अभिवादन करून बाहेर पडणाऱ्या भाविकांना तात्काळ बस उपलब्ध होत असल्याने अनुयायांनी समाधान व्यक्त केले. पोलीस व पीएमपीएलने लढवली खिंड कोरेगाव भीमा बस स्थानकावरून नगर आणि चाकण बाजूला जाणाऱ्या ६३० बसेस आणि एकूण १२६० बसेसच्या सहाय्याने सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली. कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी किंवा वाहतूक कोंडी होऊ न देता भीम अनुयायांची ने-आण करण्यात आली. हे यश जिल्हा पोलीस, पीएमपीएल कर्मचारी आणि बस स्थानक उभारणाऱ्या बांधकाम विभागाच्या सांघिक प्रयत्नांचे असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नमूद केले. बारा हजारांवर अनुयायांनी घेतली आरोग्य सुविधा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शिरूर आणि हवेली तालुक्याच्या हद्दीत एकूण २१ उपचार केंद्र उभारण्यात आली होती. या केंद्रांच्या माध्यमातून सुमारे १० ते १२ हजार अनुयायांनी विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. प्रवासादरम्यान किंवा गर्दीत त्रास होणाऱ्या नागरिकांना तात्काळ उपचार पुरवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे व राजेश कट्टीमनी यांनी दिली.