मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील या निर्णयाची राष्ट्रवादी(शप) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि इतर नेत्यांना कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे राष्ट्रवादीचे(शप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा आणि बैठका झाल्या होत्या. पण अजितदादा आता राहिले नाहीत. काही व्यापक मुद्द्यावर यापूर्वी चर्चा झाली होती. आता, पुढे काय करायचे यावर आम्ही चर्चा करू आणि नंतर निर्णय घेऊ. इतर कसे प्रतिसाद देतात, हा त्यांचा प्रश्न आहे. Sunetra Pawar सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी समारंभासाठी झालेल्या घाईबद्दलच्या प्रश्नांवर ते म्हणाले की, याची उत्तरे त्यांच्या कुटुंबाकडून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंवा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मिळायला हवीत. अजित पवार यांचे निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. राज्य शोकात असताना हा निर्णय का घेण्यात आला हे आम्हाला माहीत नाही, त्यांनाच याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. तसेच, शरद पवार यांना त्यांच्या शपथविधीबद्दल पूर्वकल्पना नव्हती. अजित पवार आणि शरद पवार यांच्या १७ जानेवारीच्या भेटीपूर्वीच्या तीन महिन्यांत आठ ते दहा बैठका झाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याच्या दिशेने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही भूमिका शरद पवार यांनाही कळवण्यात आली होती. ही बैठक पवार यांच्या निवासस्थानी झाली होती. अजितदादा म्हणाले होते की, त्यांनी या विषयावर प्रदेशाध्यक्ष आणि इतरांशी चर्चा केली आहे आणि त्यांनी हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्यात आले होते आणि निकाल जाहीर झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली होती, असे ते म्हणाले.