Shashikant Shinde : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महामोर्चा काढणार; शशिकांत शिंदेंची घोषणा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सध्याचा काळ कठीण आहे. सत्ता आणि पैसा हीच महायुतीची ताकद असून, दारूगोळा नसताना सत्ताधाऱ्यांशी लढायचे आहे. कठीण काळात उठाव केला, तरच इतिहास घडू शकतो. त्यामुळे उठाव करूनच आपल्याला पुन्हा पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न करायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
शेतकरी, कांदा उत्पादक, कामगार हे घटक अस्वस्थ असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सरकारविरोधात महामोर्चा काढण्याची घोषणा शिंदे यांनी केली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे प्रथमच नाशिक शहरात आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात शिंदे बोलत होते. राज्यातील सरकार हे उद्योगपतींना पायघड्या घालणारे असून, त्या माध्यमातून मुंबई गीळंकृत करण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
कांद्याला भाव नाही, पिकाला, दूधाला भाव मिळत नाही, पीकविमा नाही, यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. सरकार कर्जबाजारी झाले असून, सरकारकडे गरिबांसाठी, योजनांकरिता पैसे नाही. यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या प्रश्नाला हात घातला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. या मोर्चाची तयारी आतापासून सुरू करा, अशा सूचना शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच पक्षाची एकदिवसीय शिबिरेही घेतली जाणार असल्याचे शिंदे म्हणाले.
बाहेरून आलेल्यांचा पक्षावर ताबा
निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्यासाठी ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेले लोक आता पक्षाचा ताबा घेत आहेत. नेत्यांच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन येणाऱ्यांना खाली बसावे लागते आणि एकटेच गाडीतून आलेल्या नेत्यांना व्यासपीठावर बसविले जाते, याची आम्हाला लाज वाटते, अशा कठोर शब्दात कार्यकर्त्यांनी आपली खदखद थेट शशिकांत शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली. बाहेरून आलेले लोक पक्षाचा ताबा घेतात, याची आम्हाला लाज वाटत असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतर करणाऱ्यांचे कान टोचले.





