Mahesh Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक असल्याने त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागत केले जाईल, असे मोठं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी केले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत सुरू असलेल्या वादावरही स्पष्टीकरण दिले. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सादर केलेला कुणबी दाखला चुकीच्या कागदपत्रांवर आधारित असल्याची याचिका दाखल झाल्यानंतर महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. प्रिया शिंदे यांच्या माहेरच्या वंशावळीत ‘कुणबी’ असा उल्लेख असल्याने संबंधित दाखला वैध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माध्यमांनी ‘मीडिया ट्रायल’ टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. ओबीसींवर अन्याय झाल्याच्या आरोपांवर उत्तर देताना महेश शिंदे म्हणाले की, आमच्याकडून कोणताही अन्याय झालेला नाही. समोरून कुणबी उमेदवार दिल्यामुळे आम्हालाही तसाच उमेदवार द्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. दिला ‘हा’ सल्ला दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता आमदार महेश शिंदे म्हणाले की असं असेल तर मी त्यांचे स्वागत करेन. मी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व मान्य करुन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला देखील दिला असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले आहे. याशिवाय, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत आगामी काळात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला. हेही वाचा : Sara Arjun: ‘धुरंधर 2’च्या यशानंतर सारा अर्जुनची मोठी झेप; आता साकारणार मधुबालाचा आयकॉनिक रोल