मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. राज्यात विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करतानाच सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी, अशी पुरवणी मागणीही त्यांनी जोडली आहे. या संदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बळीराजाने मोठ्या आशेने शेतात पीक पिकवले होते. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. आता तरी राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का?’ असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला. ‘गेल्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा कहराने शेतकर्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्यायावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.