मुंबई : म्हाडामध्ये एक मोठे रॅकेट कार्यरत असून, या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. बिल्डर परस्पर घरे घेतात आणि ते जास्त किमतीने बाहेर विकतात, असा आरोप राष्ट्रवादी(शप) आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. या रॅकेटची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली आहे. शिंदे म्हणाले, कर्ज माफी संदर्भात दिलेल्या आश्वासनाला सरकार न्याय देईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. या ट्रिपल इंजिन सरकार वेगाने पळत आहे अशा जाहिराती केल्या जात आहेत. पण वस्तुस्थिती अशी नाही, उलट या सरकारच्या काळात क्राईम अधिक वेगवान झाल्याचे दिसत आहे. या राज्यात अनेक मुली बेपत्ता होत आहेत. जर मुलीसंदर्भात अशा घटना घडत असतील, तर गृहखाते काय झोपले आहे का? ऑनलाईन गेम आणि इतर गुन्ह्यांवर काहीही कारवाई केली जात नाही, पण विरोधकांवर तात्काळ कारवाई होते, असे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, संतोष देशमुख यांचा एक मारेकरी अजूनही फरार आहे. त्यांच्या आरोपींवर अद्यावर कारवाई झाली नाही, हे सरकराचे अपयश आहे. एक वर्ष होऊनही जर आरोपी मिळत नसेल तर ते गृहखात्याचे अपयश आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांनी भ्रष्टाचार केला असा आरोप करत त्यावर चांदिवाल समिती नेमण्यात आली. पण त्या समितीचा अहवाल अजून का आला नाही? 30 वर्षे काम केलेल्या प्रतिनिधीला अशी वागणूक दिली गेली. राज्यातील कोणत्याही खात्यातील अधिकारी असूद्या, ते मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत, त्यावर मंत्र्यांनी अंकुश ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली.